नाशिक (प्रतिनिधी): सिडको येथील गोविंद नगर भागात बांधकामाधीन इमारतीवर चौदाव्या मजल्यावर सेंट्रिंग टाकण्याचे काम सुरू असताना खाली कोसळून बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास घडली.
विश्वजीत मनजीत विश्वास (२०, रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. गोविंद नगर परिसरातील आरडी सर्कल येथे एका नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. याच इमारतीवर सेंट्रिंगचे काम चालू असताना शुक्रवारी (दि २१) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विश्वजीत १४ व्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत असताना इमारतीवरून खाली कोसळला. यामुळे त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
![]()


