नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात पेठरोडवर दुकानातील रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीला दुचाकीवरून असलेल्या तिघांनी अडविले आणि मारहाण करून त्यांच्याकडील १७ लाखांचा रोकड हिसकावून नेल्याप्रकरणी मुख्य संशयितासह ‘टीप’ देणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.
गुन्हा घडल्यापासून युनिट एकचे पथक गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रयत्नशिल होते. अखेर ४८ तासात गुन्ह्याची उकल करीत संशयितांकडून सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिलीप छाजेड यांच्या फिर्यादीनुसार, शरदचंद्र पवार मार्केट आवारातील व्यापारी पवन लोढा यांच्याकडे छाजेड हे कामाला आहेत. रात्री दुकान बंद केल्यानंतर दुकानातील रोकड घेऊन ते मालक लोढा यांच्या घरी पेठरोडने जातात. गेल्या बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे १७ लाखांची रोकड घेऊन मोपेडने जात होते.
त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना आरटीओ ऑफिसजवळील वजन काट्याजवळ अडविले आणि मारहाण करून त्यांच्याकडील रोकडच बॅग हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी म्हसरुळ पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत असताना अंमलदार विलास चारोस्कर, राजेश राठोड यांना मुख्य संशयित पेठरोड परिसरातील शनि मंदिराजवळ येणार असल्याची खबर मिळाली.
त्यानुसार सापळा रचून सराईत गुन्हेगार संदेश सुधाकर पगारे उर्फ काळ्या यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व ९ लाख ४९ हजार ८३० रुपयांची रोकड जप्त केली. तर, अंमलदार अप्पा पानवळ यांनी फुलेनगरमधून संशयित अतुल सुरज सय्यद, असलम गफुर सय्यद या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघे संशयित पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षख हेमंत तोडकर, गजानन इंगळे, रवींद्र बागुल, वसंत पांडव, सुरेश माळोदे, सुगन साबरे, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, प्रदीक म्हसदे, धनंजय शिंदे, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, अप्पा पानवळ, राहुल पालखेडे, अनुजा येलवे, किरण शिरसाठ, नाझीम पठाण आदींनी बजावली.
संशयितांनी केली रेकी:
अटक केलेल्या संशयितांपैकी अतुल सय्यद, असलम सय्यद हे दोघे लोढा यांच्याकडे कामाला होते. त्यामुळे त्यांची रोजची रोकड कधी नेली जाते याबाबत त्यांना माहिती होती. या दोघांनी संशयित संदेश पगारे, सागर पगारे, वैभव गांगुर्डे यांना सदरची माहिती दिली. त्यानुसार संशयितांनी रेकीही केली. त्यानुसार बुधवारी (ता.१७) संशयित सय्यद यांनी छाजेड रोकड घेऊन निघाल्याची टीप दिली. त्यानंतर तिघा संशयितांनी छाजेड यांचा पाठलाग करीत त्यांची लुटमार केली.
पोलिसांनी घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, लोढा यांच्या दुकानातील फुटेज मिळवून त्याचा अभ्यास केला असता संशयित अतुल व असलम सय्यद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर संशयितांनी संदेश पगारे याचा कटात समावेश असल्याचे सांगितले. त्यानुसार संदेशला सापळा रचून अटक केली. संशयितांकडून रोकड, दोन दुचाक्या, मोबाईल असा १४ लाख ३२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.