
नाशिक। दि. २० जुलै २०२५: नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या चार बांग्लादेशी महिलांना पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने अंबड पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले असून, त्यांना बनावट भारतीय ओळखपत्रे पुरवणाऱ्या एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे.
अंबड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, पंचवटीतील खैरेमळा लक्ष्मीनगर परिसरात काही बांग्लादेशी महिला अवैधरित्या राहत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली.
पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सविता उंडे, सुदाम सांगळे यांच्या पथकाने केलेल्या छाप्यामध्ये, त्या चार महिला कोणतेही वैध प्रवास किंवा ओळखपत्र नसताना भारतात प्रवेश करून नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याचे आढळले. यावेळी त्यांच्या जवळून बनावट आधारकार्ड व अन्य भारतीय नागरिकत्व दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली.
महिलांकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, नवजीत भवन दास (वय ३८, रा. खैरेमळा, नाशिक), जगदीश मिस्त्री (रा. सुरत, गुजरात) तसेच बांग्लादेशातील दोन इतर व्यक्तींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही कागदपत्रे तयार करून दिली होती. त्यानुसार इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या महिला पुढीलप्रमाणे:
- माईशा हाबिब शेख (वय २२, मुळ रा. बोरीशन, नागोर, बांग्लादेश)
- निशान मिहिर शेख (वय २१, रा. अलिपुर, जिल्हा परितपुर, बांग्लादेश)
- झुमूर हसन शेख (वय ३३, रा. शिदीपाशा, जिल्हा जोशीर, बांग्लादेश)
- रिहाना जलील गाझी (वय ३०, रा. चंडीपूर, जिल्हा बागीरहट, बांग्लादेश)
या प्रकरणात संबंधित महिलांवर आणि एजंटवर अनधिकृतरीत्या देशात प्रवेश, बनावट कागदपत्रांची निर्मिती व वापर, तसेच परराज्यातील व्यक्तींचा सहभाग यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.