नाशिक (प्रतिनिधी): पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिच्या डोक्यात मुसळीने प्रहार करत निर्घृण हत्या केली. मात्र, पकडले जाऊ नये, यासाठी पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासविले.
मात्र, आडगाव पोलिसांनी पतीसह त्याच्या भाच्यावर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मच्छिंद्र भगवान चौरे (वय ४०) व सुरेश तुळशीराम कराड (वय १९, दोघे मूळ रा. नागझरी, ता. केज, जि. बीड, ह. मु. संतकृपा अपार्टमेंट, महाराष्ट्र बँकेसमोर, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार), अशी संशयितांची नावे आहेत. यात सुरेश हा मच्छिंद्र यांचा भाचा आहे. तर नंदा मच्छिंद्र चौरे (वय ३५), असे खून केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
मच्छिंद्र हा टेलरिंगचा व्यवसाय करतो. पत्नी नंदा हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.. त्यातून दोघांत गेल्या काही महिन्यांपासून वाद होत असत. त्याचाच राग मनात धरून २८ जूनला मच्छिंद्र याने सकाळी दहाला मुलगी अंकिता आशेवाडी येथे ट्रेकिंगला गेल्याची व पत्नी नंदा ही एकटीच घरी असल्याची संधी साधत तिच्याशी वाद घातला.
यानंतर खलबत्त्यातील मुसळ तिच्या डोक्यात टाकून खून केला. त्यानंतर धास्तावलेल्या मच्छिंद्रने भाचास फोन करून बोलावून घेत मामीचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर ‘आपण हा अपघात दाखवू, तू तुझ्या नंदा मामीची स्कूटी घेऊन जा, स्कूटीची तोडफोड करून गाडी एम. के. बिअर शॉपीच्या समोरच्या रस्त्यावरील दिशादर्शक बोर्डाच्या पोलजवळ लावून ये, असे सांगितले.
मामाने सांगितल्यानुसार सुरेशने गाडीची तोडफोड करून अपघात झाल्याचे दर्शवत खुनाचा पुरावा नष्ट केला. नंदा चौरे २८ जूनला सकाळी अकरा वाजता स्कूटीने घरी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीस आडगाव येथील महाराष्ट्र बँकेसमोरील एम. के. बिअर शॉपजवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने मागून ठोस दिल्याने त्या खाली पडून जखमी झाल्याचे भासवीत डॉक्टरांना अपघात झाल्याचे खोटे सांगून मच्छिंद्र व सुरेशने खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर नंदा यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मच्छिंद्र यांच्याकडे दिला. त्यांनी नातलगांच्या उपस्थितीत आडगाव येथे अंत्यसंस्कार केले.