नाशिक (प्रतिनिधी): प्रतिबंधित गुटखा परराज्यातून नाशिकला येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पंचवटी पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत ४ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा १४.५० लाखांचा माल जप्त केला. गुरुवारी (दि. १८) ही कारवाई करण्यात आली.
परराज्यातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा नाशिकमध्ये येत असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासन विभाग व पंचवटी पोलिसांना मिळाल्याने त्यांनी अमृतयोग बिल्डिंगसमोर, मेरी -रासबिहारी लिंकरोड, आशानगर, पंचवटी, नाशिक या ठिकाणी ट्रक (जीजे २७ टीडी ६११६) अडवत पाहणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांची ४ लाख ४२ हजार पाचशे रुपयांची एकूण २९५० पाकिटे आढळली. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर, योगेश देशमुख यांच्या पथकाने हा साठा व वाहन अंदाजे किंमत दहा लाख हे जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी वाहन चालक देवी सिंह भरत सिंह (रा. नतेला, जि. प्रतापगड, राजस्थान) याच्या विरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
![]()

