कापड व्यावसायिकाच्या गोदामातील २ लाख रुपयांची चोरी उघडकीस
नाशिक (प्रतिनिधी): घरफोडीच्या गुन्ह्यात आता महिलाही सहभागी असल्याचे दिसून येत आहे. श्री रविशंकर मार्गावर कापड व्यावसायिकाचे गोदाम फोडून दोन लाखांचे कपडे चोरी करण्यात आले होते. हा गुन्हा महिलांनी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने संशयित टोळीचा गंजमाळ झोपडपट्टी येथे माग काढत पाच महिलांना अटक केली. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पथकाचे विशाल काठे यांना, गंजमाळ येथे काही महिला नवे कपडे कमी भावात विक्री करत आहेत, अशी माहिती मिळाली होती. पथकाने खात्री करून घेतली असता काही महिला, टी शर्ट, बनियन, शर्ट, पॅन्ट आदी कपडे कमी भावात विक्री करत असल्याचे समजले.
क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरात छापा टाकला. संशयित पाच महिलांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता संशयित महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.
संशयित टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार:
संशयित महिलांच्या टोळीच्या चौकशीत शहरात काही चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. महिला रेकी करुन घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. येळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक कड यांनी व्यक्त केली.