नाशिक | दि. १८ सप्टेंबर २०२५: पपया नर्सरी परिसरात बुधवारी दुपारी एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र प्रसंगावधान राखून तरुणाने पलायन करत आपला जीव वाचवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा प्रयत्न झालेला तरुणाचे नाव तेजस धाडगे (२४, रा. मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर) असे आहे. बुधवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास तेजस हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी हिंद सोसायटीतील चहाच्या टपरीवर आला होता.
यावेळी गिरीश शिंगोटे (रा. सिंहस्थनगर, सिडको) हा चारचाकी वाहनासह (एमएच ०६ एएस ५५१७) चार-पाच साथीदारांसोबत तेथे आला. त्यांनी तेजसला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावला व जबरदस्तीने गाडीत बसवून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्र्यंबक रोडवरील शिव हॉस्पिटलजवळ संधी साधून तेजसने पलायन केले व थेट पपया नर्सरी पोलिस चौकी गाठली.
तक्रारीत तेजसने नमूद केले की, संशयितांनी त्याला ठार मारण्याची धमकीही दिली. यानंतर पोलिसांनी गिरीश शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवर व त्यांच्या साथीदारांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे करीत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा क्र. २९१/२०२५)
![]()

