नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात दिवसेंदिवस भाईगिरी फोफावत चालली आहे. औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंकरोड भागात किरकोळ कारणातून दाम्पत्यावर चाकू हल्ला करीत टोळक्याने कार फोडल्याची घटना घडली. या घटनेत दाम्पत्य जखमी झाले असून लहान मुलीच्या डोक्याचे केस ओढण्यात आले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजा अतुल सोनजे (रा.हनुमान मंदिराजवळ, अंबडलिंकरोड) या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जखमी पुजा व अतुल सोनजे (४५) हे दाम्पत्य सोमवारी (दि.१६) लहान मुलीस सोबत घेवून अंबड लिक रोडवरून आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दत्त मंदिर चौकात गर्दी असल्याने कार धिम्यागतीने जात होती. याचवेळी आरडाओरड करीत दुचाकीवर आलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने सोनजे यांना कार पाठी मागे घेण्याचा सल्ला दिला. यावेळी सोनजे यांनी आपल्याला कार पाठीमागे वळविता येत नसल्याचे सांगितल्याने संतप्त टोळक्याने दांम्पत्यास शिवीगाळ करीत हा हल्ला केला.
कारचा दरवाजा बळजबरीने उघडून सोनजे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने धारदारचाकूने त्याच्यावर वार केल्याने बाजूलाच बसलेल्या पत्नी पुजा या आपल्या पतीच्या बचावासाठी धावून गेल्या असता त्यांच्या हातावरही चाकूचा घाव घालण्यात आला. या हल्यात टोळक्याने कार फोडून नुकसान करीत सिटावर बसलेल्या लहानग्या मुलीचे केस ओढले.
कशीबशी सुटका करून दाम्पत्य उपचारार्थ दवाखान्यात दाखल झाले असून त्यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राहूल नळकांडे करीत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३६/२०२४)