नाशिक: कॉलेजरोडवर बंगल्यात शिरून वृद्धावर चाकू हल्ला; पावणेपाच लाखांचा ऐवज लुटून चौघे फरार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजरोडवर असलेल्या तपस्वी बंगल्यात मंगळवारी (दि. १६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चौघा अज्ञात इसमांनी बळजबरीने प्रवेश करत वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून धमकावले. वृद्धाने प्रतिकार केला असता त्यांच्यावर चाकूने वार केले. यावेळी लुटारूंनी सुमारे ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एचपीटी महाविद्यालयासमोरील बाजूस फिर्यादी शशिकुमार माधवराव तपस्वी (७५) यांचा एकमेव बंगला आहे. ते त्यांच्या पत्नीसह या ठिकाणी मागील ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांची मुले परदेशात स्थायिक आहेत. मंगळवारी पंचवटी येथील काळाराम मंदिरातून दर्शन घेऊन ते रात्री घरी आले. दहा वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी चौघे तरुण त्यांच्या बंगल्यात शिरले. त्यावेळी वीजपुरवठा का खंडित झाला हे बघण्यासाठी शशिकुमार हे मुख्य द्वारावर आले असता या लुटारूंनी त्यांना आतमध्ये ढकलून देत दागिने, पैसे जेवढे असतील तेवढे काढून द्या, असे सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

यावेळी त्यांच्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखविला, लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, कर्णफुले, अंगठी असे तीन लाख रुपये किमतीचे दागिने, घरात असलेली ५५ हजारांची रोकड, १ लाख २० हजार रूपये किंमतीचे दोघांचे मोबाइल असा सुमारे पावणे पाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. त्यांनी घरातील दुरध्वनीवरून त्यांच्या पुतण्याला संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

त्याने पोलिसांना माहिती देताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाम्पत्यांना थीर देत घटनास्थळाचा पंचनामा करून तातडीने तपासाची चक्रे फिरविली. बुधवारी (दि.१७) सायंकाळी गंगापुर पोलिस ठाण्यात बळजबरीने घरात शिरून दुखापत करत जबरी लुट केल्याप्रकरणी अज्ञात टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790