नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): तुमच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने पॉलिश करून चकाचक करून देतो असे सांगून दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेचे तब्बल पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार अशोकनगर येथे शुक्रवारी (दि. १५) भरदिवसा सकाळी १०.३० वाजता घडला.
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वा. दोन भामटे राज्य कर्मचारी सोसायटीतील फ्लॅट नं. ८ या ठिकाणी आले. त्यातील एक भामटा घरात तर एक भामटा घराबाहेर दुचाकीजवळच उभा होता.
पहिल्या भामट्याने घरात शिरून गोयल यांच्या आईचे चांदीचे पैजण चकचकीत केले. नंतर गोयल यांच्या आईकडे इतर दागिने मागितले. सोनसाखळी, बांगड्या व इतर दागिने एका भांड्यात ठेवत ते भांडे गॅसवर ठेवण्यास सांगितले.
यावेळी आईची नजर चुकवून सदरचे दागिने घेऊन १५ मिनिटात तेथून भामटे फरार झाले. सीसीटीव्हीत दोन भामटे दुचाकीवर जाताना दिसत आहेत. या घटनेनंतर सदर महिलेने ही घटना आपल्या कुटुंबियांना व आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला, परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, या घटनेप्रकरणी गोयल यांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.