नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पाथर्डी फाटा परिसरात फटाके फोडण्याच्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीत हत्येची घटना घडल्याने शहरासह पाथर्डी फाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव तुकाराम आखाडे (वय ३१, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवार (दि.१२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाथर्डी गावातील स्वराज्य नगर येथे मयत गौरवच्या घराबाहेर त्याच्या शेजारी राहणारे कुटुंबीय फटाके फोडत होते.
यावेळी आखाडे याने लहान मुले दचकतात म्हणून फटाके मैदानात फोडण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी काही युवकांशी फटाके फोडण्यावरून वाद झाला.
यानंतर काल त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर शेजारच्या कुटुंबियातील काहींनी रागाच्या भरात आखाडे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.