नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२५: आडगाव शिवारात इंधन चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. सहा ते सात जणांच्या टोळक्याने ट्रान्सपोर्टवर उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून सुमारे चारशे लिटर डिझेल (३५ हजार रुपये किमतीचे) लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) पहाटे घडली.
आडगाव शिवारात मालवाहू वाहनांचे ट्रान्सपोर्ट आहे. व्यावसायिक संतोष भागवत यांनी आडगाव शिवारात त्यांचा ट्रक तसेच त्यांचा मित्र चंदू यादव यांचा ट्रक उभे केले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास टोळीने एका फॅमिली कारमधून येत या दोन्ही ट्रकच्या इंधन टाकीमधून डिझेलची चोरी केली. यानंतर कार घटनास्थळी सोडून तेथून दुसरे वाहन घेऊन पळ काढला, असे भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट असून, अवजड वाहने याठिकाणी थांबतात. तसेच ट्रक टर्मिनलदेखील याच भागात आहे. यामुळे रात्रीच्या सुमारास या परिसरात अधिक प्रभावीपणे पोलिस गस्त करण्याची मागणी होत आहे.
चोरांकडून अवजड वाहनांचे इंधन, बॅटऱ्या तसेच काही मालदेखील लांबविण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790