नाशिक। दि. १२ जुलै २०२५: २० रुपये सीट प्रमाणे भाडे देण्यास नकार देणाऱ्या तीन प्रवाशांवर रिक्षाचालकाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार निमाणी बसस्थानकासमोर घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षवर्धन यादव या मजुराने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ वाजता मित्र आनंद मालणी व विक्की कमोळेकर यांच्यासोबत जात असताना निमाणी स्थानकासमोरील थांब्यावर रिक्षाचालकास आडगावनाका येथे जाण्याचे भाडे विचारले. चालकाने २० रुपये सीट असे भाडे सांगितले. यादव यांनी १० रुपये घ्या, असे विचारले असता रिक्षाचालकाने नकार दिला. यानंतर यादव आणि दोघे मित्र पायी आडगावनाक्याकडे निघाले.
थोडे पुढे गेल्यानंतर रिक्षाचालकाने पाठीमागून येत रिक्षाने आनंद मालणी यांना धक्का दिला. यादव रिक्षाच्या मागे पळाले व रिक्षाचालकाला बाहेर ओढले असता त्याने खाली वाकून शस्त्र काढून यादव यांच्यावर हल्ला केला. दोघे मित्र सोडवण्यास आले तर त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४३/२०२५)