नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथे शिवाजी पुतळा येथे ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यावेळी संशयितानी मदतीच्या बहाण्याने हातचलाखीने सोन्याची चैन व अंगठी लंपास केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७६ वर्षीय वृद्ध हरि महादू आहेर (रा. सी.जी. सोसायटी, अश्विनी कॉलनी, सामनगाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते शनिवारी (ता. ११) सकाळी ९ वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या शिवाजी पुतळ्याजवळून पायी जात होते.
त्यावेळी तरुण संशयित त्याच्याजवळ आला आणि त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत पुढे मारहाणीची घटना घडली असून, तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यावेळी आहेर यांनाही ते खरे वाटले आणि त्यांन गळ्यातील सोन्याची चैन व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढू लागले.
त्यावेळी संशयिताने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत सोन्याचे दागिने स्वत:कडे ठेवून घेत रुमालाला गाठ मारून त्यांना दिले. त्यानंतर संशयित पसार झाला. जरा वेळाने आहेर यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यात दागिने नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.