नाशिक | दि. ११ जुलै २०२५: शहरातील फर्नांडिस वाडी परिसरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वर्चस्वाच्या झगड्यात थरारक गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत ३ संशयित आरोपींसह ३ विधीसंघर्षित बालके अशा एकूण ६ जणांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी यावेळी २ गावठी कट्टे, गोळी, एक मारुती स्विफ्ट कार आणि मोबाईलसह सुमारे ३.३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुरुवारी (दि. १० जुलै) रात्री ०२:०० वाजेच्या सुमारास फर्नांडीस वाडी येथील सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे साथीदार तसेच त्याचे विरोधक रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इरशाद चौधरी, सुशांत नाटे, बरक्या उर्फ श्रीकांत वाकोडे व इतर अशांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून एकमेकांविरोधात टोळी वर्चस्वावरून व हप्ते जमा करण्यावरून वाद विवाद करून सार्वजनिक ठिकाणी लाकडी दांडे, धारदार शस्त्रानिशी जावुन दहशत निर्माण करून एकमेकांना जिवेठार मारण्याच्या उददेशाने एकमेकांवर गोळीबार केला होता.
यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. तसेच रोहित डिंगम व त्याचे साथीदार यांनी राहुल उज्जैनवाला याची काकु जसलीन हिच्या घरावर दगड व बिअरच्या बाटल्या फेकुन तेथुन पळुन गेले होते म्हणुन त्याच्या विरूध्द उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, गुन्हेशाखा युनिट क्रमांक २, गुंडा विरोधी पथक तसेच पोलीस ठाणे यांचेकडील विविध पथके तयार करून सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती.
दिनांक १० जुलै रोजी रोजी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाणे कडील गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील पाहिजे आरोपी सनी उर्फ टक्या रावसाहेब पगारे, (रा-जेतवननगर, जयभवानीरोड, नाशिकरोड) येथुन ताब्यात घेण्यात आले.
तसेच गुन्हयातील इतर आरोपी यांचा गुंडा विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि अंमलदार असे शोध घेत असतांना सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी इरशाद मोहम्मदअली चौधरी (वय-२१वर्षे, रा-रमा कॉलनी, देवळालीगाव, नाशिक) यास केरू पाटील नगर, नाशिकरोड येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली एक मारूती स्वीप्ट कार क्रमांक: एम.एच १५-डी.सी-७०९९ तसेच दोन गावठी कट्टे व एक फायर केलेला राउंड, मोबाईल असा एकुण ३,३०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील अधिकारी व अंमलदार असे सदर गुन्हयात सहभाग असलेल्या इतर पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील अंमलदार यांनी नाशिकरोड, जेलरोड या भागातुन आरोपी नामे शेबाज आरिफ पिरजादे, (वय-२१वर्षे, रा-हरिमंजिल सोसायटी, द्वारका नाशिक) व ३ विधिसंघर्षित बालके यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण व गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील अंमलदार हे सी.सी.टी.व्ही फुटेजच्या माध्यमातुन नाशिक शहराच्या बाहेर इतर आरोपीतांचा शोध घेत आहेत.
वरील सर्व आरोपी व विधीसंघर्षित बालके यांच्याकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईकामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.