अन्य दोन दुचाकींचेही झाले नुकसान
नाशिक (प्रतिनिधी): पती-पत्नीत वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने मध्यरात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका फ्लॅटधारकाच्या दुचाकीलाच आग लावली. त्याची आच शेजारी असलेल्या दोन दुचाकींना लागली. त्यांचेही किरकोळ नुकसान झाले. अंबड भागात गुरुवारी ही घटना घडली.
सुभाष गोपाळ साबळे (रा. स्वामीनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. ६ मे रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपी विनितकुमार अशोक सिंग (३७) याचे पत्नीशी काही कारणातून भांडण झाले. भांडणाच्या रागातून विनितकुमार सिंग याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुरैयासिंग यांच्या मालकीची एमएच १५ एचव्ही ९५७४ ही दुचाकी पेटवून दिली. त्यामुळे या वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी अंबड पोलिसात विनितकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१३/२०२४)
पोलिसांत गुन्हा दाखल: आगीची झळ प्रदीप सुराल यांच्या एमएच १५ जीएल २८८९ व राजेंद्र देवरे यांच्या एमएच १५ डीबी ३२७४ या क्रमांकाच्या वाहनांसही बसली. ही दोन्ही वाहने शेजारीच उभी होती. पार्किंगमधील इलेक्ट्रिक वायरिंग व फ्लॅट नंबर १ च्या दरवाजाचेदेखील या घटनेत जळाल्याने नुकसान झाले.