नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२५: सुनेने सासूला खाण्यासाठी पान आणू न दिल्याने झालेल्या वादात सुनेने सासूला गळा दाबून ठार मारल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा करण्यात येऊन सुनेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकिना गफार शेख (८९, रा. साईदर्शन अपार्टमेंट, आडकेनगर, देवळाली कॅम्प) या घरात असताना दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांचा सून संशयीत शबाना शेख यांच्याशी वाद झाला. शबाना यांचे जेठ रौफ हे खाण्यासाठी पान आणणार असताना सुनेने सासूला पान आणू नका, असे म्हटले. यावरून वादावादी झाली. अगोदरच सासूच्या आजारपणाला कंटाळलेल्या सुनेने रागातून सासूचा गळा दाबला.
त्यांना उपचारार्थ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी हवालदार आशिष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सून शबाना अब्दुल अजिज शेख (वय: ४२) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. (देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ९३/२०२५)
![]()

