नाशिक | दि. ७ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या खुनाच्या आणि गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, जय भवानी रोड परिसरात पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मृताचे नाव अमोल मेश्राम (वय ४३) असे असून, त्याचा आज (मंगळवार) पहाटे खून करण्यात आला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे कुणाल सौदे आणि अमन शर्मा अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आर्थिक आणि प्रॉपर्टी संबंधित वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, अमोल मेश्राम पहाटे सुमारास दररोजप्रमाणे जवळील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्याच वेळी अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला. बराच वेळ घरात परतला नाही, म्हणून आई त्याच्या शोधात गेली असता तिला अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तत्काळ त्याला बिटको रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
अलीकडेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी १२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. तसेच शहरात नाकाबंदी आणि तपास मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र गुन्हेगारी काही थांबायचं नाव नाहीये.
दरम्यान, या खुनाबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून, अटकेत असलेल्या संशयितांकडून चौकशीद्वारे अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
![]()

