नाशिक। दि. ७ जानेवारी २०२६: जगातील कोणत्याही हॉटेलमध्ये दरवर्षी दहा दिवस मोफत मुक्कामाची ‘आकर्षक’ ऑफर देत एका खासगी कंपनीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पाटील (वय: ६३ ) यांना मोबाईलवर संपर्क साधून मुंबई नाका परिसरातील महामार्गालगत असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे क्लब रिसॉर्ट व्हॅकेशन नावाच्या खासगी कंपनीचे संचालक कपिल सिंग, अपर्णा चौहान, रविकुमार सिंग, अभिषेक गौतम तसेच त्यांच्या अन्य साथीदारांनी पाटील यांना विविध योजनांची माहिती देत विश्वासात घेतले.
अॅटोमोबाइल क्षेत्रातील नामांकित कंपनीची कार वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष मेंबरशिप असल्याचे सांगत, ही मेंबरशिप घेतल्यास सलग १५ वर्षे जगातील कोणत्याही हॉटेलमध्ये दरवर्षी दहा दिवस विनामूल्य मुक्काम करता येईल, असा दावा करण्यात आला. या आमिषाला बळी पडून पाटील यांनी मेंबरशिपच्या नावाखाली दोन लाख रुपये भरले. मात्र नंतर ही योजना बनावट असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी संबंधित कंपनीच्या संचालक व उपस्थित व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक गोडे पुढील तपास करीत आहेत.
![]()


