नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२५: भावाला भेटण्यासाठी रिक्षाने प्रवास करणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या एका युवकाला दोघा साथीदारांनी विडी कामगारनगर जवळील पाटाजवळ घेऊन गेले. त्याला दंडुक्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने लुटून पोबारा केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजता घडली.
या जबरी लूटप्रकरणी मूळ उत्तर प्रदेश आजमगड व हल्ली आडगावला राहणाऱ्या शकील वकील अन्सारी (वय: १९) याने आडगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात संशयित रिक्षाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्सारी हा त्याच्या भावाला भेटण्यासाठी कैलास नगरला जाण्याकरिता रिक्षामध्ये बसला होता.
त्यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा कैलास नगरला न घेऊन जाता पाटाजवळ नेली व त्या ठिकाणी युवकाला खाली उतरवून दंडुक्याने मारहाण करण्याची धमकी देत दोन मोबाईल लुटून पलायन केले. याप्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २५३/२०२५)