नाशिक (प्रतिनिधी): चांदशी शिवारात गोदाकाठी गरोदर पत्नीला घेऊन जात निघृणपणे ओढणीने तिचा गळा आवळून खून करणारा तिचा पती संशयित विकी राय सुकेसर (२०, रा. सातपूर) यास जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी (दि. ५) नाशिक तालुका पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदशी शिवारात गोदाकाठाशेजारून आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जन भागात संशयित विकी हा त्याची पत्नी अमृताकुमारी सुकेसर (१९) हिला तीन ते चार दिवसांपूर्वी घेऊन गेला होता. येथील बाभळीच्या झाडांमधून टेकडीवर गेल्यानंतर तेथे ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून त्याने पळ काढला होता. तालुका पोलिसांना सोमवारी (दि. ३) बेवारसपणे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. मंगळवारी शवविच्छेदनातून घातपात उघड झाला. विकी याने पत्नी अमृताकुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत त्या कारणातून गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे.
तालुका पोलिसांनी विकी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्याच्याविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.