नाशिक। दि. ५ ऑगस्ट २०२५: अंबड आणि देवळाली कॅम्प परिसरात दहशत निर्माण करणारे आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघा सराईतांना १ व २ वर्षाकरीता शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.
ऋतिक उर्फ गजाळ्या वसंत रकताटे (रा. पाटीलनगर, सिडको), भिमराव उर्फ लखन सुधाकर डांगळे (रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) असे या सराईतांचे नावे आहे. परिमंडळ २ च्या कार्यालयाने ही कारवाई केली. रकताटे विरोधात नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवणे, मारहाण करत गंभीर दुखापत करणे, घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देणे, आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांच्या आधारे त्याला २ वर्ष तर लखन डांगळे याला १ वर्ष तडीपार करण्यात आले. गणेशोत्सव काळात आणखी गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे. परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून गणेशोत्सव काळात ही कारवाई केली जाणार आहे.