नाशिक, दि. ५ जानेवारी २०२६: शहरात शनिवारी (दि. ३) पेठ रोडला आरटीओ ऑफिसजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. रवी संजय उशिले (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी उशिले याचा ओम गवळी व संतोष गवळी यांच्याशी यापूर्वी वाद झाला होता. शनिवारी रात्री जेवणानंतर फिर्यादी समाधान गोऱ्हे हे घराबाहेर फेरफटका मारत असताना रवी उशिले यांच्याशी बोलत होते. याच वेळी त्याच परिसरात राहणारे संशयित ओम व संतोष गवळी तेथे आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
संशयित ओम आणि संतोषने लाकडी दांड्याने तसेच चॉपरने रवीच्या पोटावर व डोक्यावर जोरदार वार केले. या हल्ल्यात रवी उशिले याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार विल्होळी येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागील परिसरातून दोन्ही संशयितांना अटक केली.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०४/२०२६)
![]()


