नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल (गुरुवारी) मध्यरात्री नाशिकरोड- जेलरोड परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्याचे नाव रितेश डोईफोडे (वय अंदाजे २५) असे असून, प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
घटनेनंतर हल्लेखोराने स्वतःहून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राणघातक हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास:
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजता जेलरोड भागात दोन तरुणांवर धारदार शस्त्र आणि दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रितेश डोईफोडे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर पोलीस ठाण्यात हजर:
हल्ल्यानंतर आरोपीने स्वतः नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, रितेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.