नाशिक। दि. १ नोव्हेंबर २०२५: शस्त्र दाखवून सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगार अनिकेत उर्फ बाल्या दातखिळे याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्यास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन गोपनीय साक्षीदारांच्या माहितीच्या आधारावर पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी चौकशी पूर्ण केली असून, दातखिळे यास तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला.
नाशिक शहरात कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया करण्यात येत आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांनी ही कारवाई पार पडली. अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील दातखिळे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यात शस्त्र बाळगून जीव घेण्याचा प्रयत्न करणे, गैरकायदेशीर मंडळी जमवून मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे तसेच लोकांना धमकावणे यांसारखे गंभीर प्रकार समाविष्ट आहेत.
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून हद्दपार केल्यानंतरही हा हद्दपार केला गेलेला गुन्हेगार परिसरात दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. तसेच गुन्हेगारांना थेट वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगविंदर सिंह राजपूत यांनी कळवले आहे.
![]()

