नाशिक (प्रतिनिधी): सराफ बाजारातील एका सराफी व्यावसायिकाकडे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सराफी कारागिराला रिक्षात बसवून त्याच्याकडे असलेले सुमारे तीन तोळे सोन्याची लूट करून पोबारा करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून ३२.७२५ ग्रॅम सोने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा एकूण ३ लाख २९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील रविवार कारंजा ते अहल्यादेवी होळकर पुलादरम्यान रिक्षा प्रवास करताना फिर्यादी भूषण श्रीधरराव घोडके (६२, रा. पंचवटी) यांच्या खिशातून संशयित आरोपी मोइन महेबुब शहा (२७), वसीम लतीफ शहा (२७, दोघे रा. घरकूल बिल्डिंग, वडाळा) यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सुमारे तीन तोळे सोने चोरी केले होते. याप्रकरणी घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ लाख ५ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास सरकारवाडा गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखा युनिट-१चे पथक करत होते. अंमलदार आप्पा पानवळ यांना या गुन्ह्यातील चोरांबाबत गोपनीय माहिती मिळाली. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा घेऊन संशयित याठिकाणी आले असता, पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
👉 मोइन हा त्याच्या साथीदारांसह गंगापुररोड येथील एका महाविद्यालयाजवळच्या उड्डाणपुलाखाली येणार असल्याचे समजले.
👉 वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंके, देविदास ठाकरे, रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, मुख्तार शेख, जोगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे आदींच्या पथकाने सापळा रचला.