नाशिक (प्रतिनिधी): साखर एक्स्पोर्टचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस साखर एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली तब्बल दोन कोटी ५३ लाखांना गंडा घालणाऱ्या संशयितास गुंडाविरोधी पथकाने मीरा भाईंदर हद्दीतून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
जानेवारी २०२३ मध्ये संशयिताने फसवणूक केली होती. अमित अनंत महाडिक (वय ४३, रा. गुलमोहर कॉम्प्लेक्स, फेझ १, वसई विरार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अमित यास बोळींज पोलिस ठाणे, मीरा भाईंदर हद्दीतून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
मुख्य संशयित अमित महाडिक याचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून तो वसई विरार (जि. पालघर) या भागात असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १०) वसई विरार येथे रवाना करून सदर गुन्ह्यातील संशयित अमित महाडिक यास बोळींज पोलिस ठाणे, मीरा भाईंदर हद्दीतून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरीत्या कामगिरी पार पाडली.
नक्की काय आहे घटना:
रिता गौरव दाणी (रा. नाशिक रोड) यांनी साखर एक्स्पोर्टचा व्यवसाय सुरू केल्याने स्टर्लिंग पॉवर जिनेसीस कंपनी, मुलुंड, मुंबई यांनी फिर्यादींना श्रीलंकेत १२ हजार टन साखर पाठविण्याची ऑर्डर दिली होती. दाणी यांनी संशयित अमित महाडिक यास साखर खरेदी करायची असल्याचे सांगितले असता अमितने कोल्हापूर येथून २० कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी दाणी यांच्याकडून दोन कोटी ५३ लाख ३५ हजार ३४७ रुपये टप्प्याटप्प्याने स्वतःच्या बँक खात्यावर घेतले.
अमितने २० कंटेनर साखर सुप्रीम कंटेनर लाईन शिपींग कंपनीमार्फत श्रीलंकेत पाठविण्यासाठी खरेदी केल्याचे सांगितले; परंतु दाणी यांनी सुप्रीम कंटेनर लाईन शिपींग कंपनीत माहिती घेतली असता संशयित व पाच ते सहा साथीदारांनी साखर खरेदी न करता फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी अमित अनंत महाडिक व इतर पाच जणांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.