नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील इंडियन बँकेत चोरी करून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने विविध ठिकाणी चोरी व घरफोडी केलेल्या एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून तब्बल एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार शिवशंकर प्रसाद (वय २२, रा. मुळगाव लक्ष्मीपूर, बिहार सध्या अंबड) असे जबरी चोरी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. गेल्या वर्षी १८ जुलै २०२३ रोजी याच संशयिताने अंबडच्या इंडियन बँकेतील स्ट्रॉंग रूमला भगदाड पाडून बँकेतील तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर तब्बल वर्षभरापासून संशयित फरार होता. यानंतर १९ जुलै २०२४ रोजी याच चोरट्याने पुन्हा एकदा इंडियन बँक फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही व पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अमित कुमार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्याने अंबड औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही चोरी केल्याचे कबूल केले. एकूण सात चोरीचे गुन्हे या चोरट्याकडून उघडकीस आले असून यातून तब्बल १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
संशयित अमित कुमार प्रसाद हा चोरटा मूळ बिहार येथील आहे. हा वर्षभरापूर्वी नाशिक शहरात कामानिमित्त आला होता. यावेळी इंडियन बँकेत खाते खोलण्यासाठी गेल्यानंतर या ठिकाणी सर्व काही पाहून याच ठिकाणी चोरी करण्याचे त्याने ठरवले होते. नंतर तब्बल दोनदा बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे यांच्या पथकाने केली.