नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कालिका माता मंदिरामागील सहवासनगरमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चार महिन्यांपासून पसार असलेला संशयिताला दिंडोरीतून शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. निलेश सावकार गिते (२४, रा. मोरे मळा, पंचवटी) असे संशयित गुन्हेगाराचे नाव आहे.
१९ एप्रिल २०२४ रोजी रात्री मागील भांडणाची कुरापत काढून संशयित टोळक्याने पियुष भीमाशंकर जाधव याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. यातील संशयित निलेश गिते हा मात्र तेव्हापासून पसार होता. गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड हे भद्रकाली हददीत गस्तीवर असताना, त्यांना संशयित गिते याची खबर मिळाली.
गिते परजिल्ह्यात फिरत असून, पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र बुधवारी (ता. १४) तो दिंडोरी येथे मित्राला भेटायला येणार असल्याची खबर मिळताच पथकाने दिंडोरीमध्ये सापळा रचून तळेगाव सबस्टेशन रोडवर अटक केली. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास जेरबंद केले.
त्यास तपासकामी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाकय निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, सुनील आडके, अशोक आघाव, सुवर्णा गायकवाड यांनी बजावली.