नाशिक (प्रतिनिधी): एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संशयितास अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव सोनजे यांचे एटीएम कार्ड बदलून संस्थेने आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार अनिल गाढवे यांना संशयित आरोपी हा दत्त चौक या ठिकाणी फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने दत्त चौक परिसरात सापळा रचून संशयित आरोपी सलमान रिझवान खान (२१, प्रतापगढ, उत्तरप्रदेश, सध्या रा. अँटॉप हिल, वडाळा, मदिना मशीदजवळ, मुंबई) यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई अंबड पोलिस
ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार, जे. बी. शिरसाठ (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि झनकसिंग घुनावत, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, संदीप भुरे, समाधान शिंदे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास जयंत शिरसाठ करत आहे.
अशी केली छेडछाड:
या ठगाने एटीएम मशीनमधून रक्कम येणाऱ्या भागात चिकटपट्टी लावली होती. त्यामुळे येणाऱ्या नोटा त्यात अडकून राहायच्या. त्या बाहेर पडत नव्हत्या. रक्कम काढायला आलेल्या व्यक्तीला मशीनमध्ये बिघाड आहे असे वाटायचे. त्यामुळे ते रक्कम न घेताच बाहेर पडायचे. त्यानंतर हा भामटा आता जाऊन त्यातून रक्कम ताब्यात घ्यायचा. सीसीटीव्हीत हे कैद झाले होते. अशाप्रकारे सुमारे दीड लाख रुपये त्याने लुबाडल्याची प्राथमिक माहिती आहे.
![]()


