
नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास जबर मारहाण करणाऱ्या फरार संशयित आरोपीस बेड्या ठोकण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे.
दिनांक १ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान फिर्यादी जमीरउल्ला नवास अलीखान व साक्षीदार यांच्या तक्रारी नुसार त्यांना अंबड लिंकरोड, सातपुर येथे संशयित आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सैय्यद, गुड्डु सैय्यद व इतर यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढुन लोखंडी सळइने जबर मारहाण केली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे बीएनएस ११८(२), ११५, ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. ( गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८९/२०२५ ) सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्हयातील आरोपी फरार आहेत.
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार भुषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी दोन दिवस सतत अंबड पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे भागात गुन्हयातील पाहीजे आरोपीतांची अधिक माहिती काढुन शोध घेतला. यावेळी ९ मार्च रोजी एमआयडीसी अंबड परिसरात गुन्हयातील मुख्य पाहीजे संशयित आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सैय्यद वय २५ वर्षे रा. अमोल किराणा जवळ, संजीवनगर, अंबड लिंक रोड, नाशिक हा असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने त्यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याची विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, भुषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.