नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित सांबरे यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्रमोद जालिंदर रणमाळे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सांबरे यांचा १४ महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सांबरे यांचा खून असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने संशयित रणमाळे याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान पुढील कार्यवाहीसाठी त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (युनिट २) विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे, सपोउपनिरी यशवंत बेंडकोळी, पोहवा मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकाने केली.
असा रचला खुनाचा कट: मृत अभिजित सांबरे व संशयित रणमाळे हे मित्र होते. त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद होता. रणमाळेने गोड बोलून २७ जून २०२३ रोजी आर्थिक व्यवहारासाठी सांबरे यास येवला येथे जायचे असल्याचे खोटे सांगून नेले. अभिजितच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेत रात्री नऊच्या सुमारास दारूमधून उच्च रक्तदाबाच्या व झोपेच्या अतिरिक्त गोळ्यांचा डोस मिसळून त्यास दारू पाजली.
दुचाकीवर बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला. शुद्ध हरपल्याचा अंदाज घेत गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्यालगत फेकून देत पोबारा केला होता. याबाबत सांबरे यांच्या परिवाराने संशयित रणमाळेवर संशय घेतला होता. त्यानुसार पोलिस त्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले.