
नाशिक। दि. ३१ ऑगस्ट २०२५: अंबड पोलिस ठाण्यातील घरफोडी, वाहन चोरी आणि लुटीच्या गुन्ह्यासह अन्य ८ गुन्ह्यांत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मुळ तक्रारदारांना परत केला. गणेशोत्सवात चोरी झालेल्या मौल्यवान वस्तू आणि वाहन असा १५ लाखांचा मुद्देमाल परत मिळाल्याने गणपती पावल्याच्या भावना तक्रारदारांनी व्यक्त केल्या. शनिवारी पोलिस ठाण्यात मुद्देमाल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केल्या आहेत. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने ८ गुन्ह्यांतील १५ लाखांचा किमती मुद्देमाल जप्त केला होता. उपआयुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते तक्रारदारांना मुद्देमाल वाटप करण्यात आला. गेलेल्या वस्तू, दागिने परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे अभार व्यक्त केले. विशेष म्हणजे गणेशोत्सवात तक्रारदारांच्या चेहऱ्यावर पोलिसांनी हास्य फुलवल्याने खऱ्या अर्थाने गणपती पावल्याच्या भावना तक्रारदारांनी व्यक्त केल्या.
![]()

