गुंडाविरोधी पथकाची जलद कारवाई; जुन्या वादातून हल्ला केल्याचे उघड

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२५: द्वारका परिसरातील कराड बंधू चिवडा व भेळभत्ता दुकानावर कोयत्याने हल्ला करून दुकानाचे नुकसान करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास तोंडावर मास्क घातलेल्या अनोळखी तरुणांनी खरबंदा पार्कलगत असलेल्या कराड बंधू चिवडा व भेळभत्ता दुकानावर हल्ला केला. त्यांनी दुकानाच्या दिशेने विटा फेकल्या, कोयत्याने काउंटरवर वार केले तसेच शेजारील उत्तम पेढा सेंटरच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी विक्रांत कराड यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या प्रकारची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपींना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथक — अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे आणि घनश्याम महाले — यांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना सुगावा लागला की आरोपी समता नगर, आगर टाकळी रोड परिसरात लपले आहेत. त्यानुसार पथकाने त्या परिसराला वेढा घातला. यादरम्यान प्रेम प्रदीप गांगुर्डे (वय १९, रा. समता नगर) हा तरुण सलूनमधून पळून गेल्याचे समजले. त्याला त्याच्या राहत्या घरातून पकडून चौकशी केली असता त्याने हल्ल्याची कबुली दिली.
त्याच्या माहितीवरून पथकाने आणखी दोघा विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत उघड झाले की, यातील एक मुलगा एका कुशनच्या दुकानात कामाला होता. त्याचा ‘कराड बंधू भेळभत्ता’ दुकानात काम करणाऱ्या यश याच्याशी काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.
प्रेम प्रदीप गांगुर्डे आणि दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांच्या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे अल्पावधीतच आरोपी गजाआड झाले असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
![]()

