
नाशिक। दि. २९ जुलै २०२५: सेवानिवृत्त न्यायाधीश व प्राध्यापकांच्या बंद घरांना लक्ष्य करत मौल्यवान वस्तू गायब करून पोबारा करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. जॉय ऊर्फ भुऱ्या विजय नानाजी (२६), चेतन कैलास सोनवणे (दोघे रा. शरणपूर वसाहत, कॅनडा कॉर्नर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
चेहडी पंपिंग मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणारे सेवानिवृत्त न्यायाधीश फिर्यादी रवींद्रनाथ गांगुर्डे यांच्या घरी पंधरवड्यापूर्वी घरफोडी झाली होती. चोरट्याने त्यांच्या घरातून वीस हजारांची रोकड गायब केली होती. तसेच शहरातील तिडके कॉलनीतील गायकवाडनगर येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका फिर्यादी ज्योती कुलकर्णी यांचे बंद घर फोडून चोराने सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल लंपास केले होते.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, विशाल पाटील, विष्णू गोसावी, अविनाश देवरे, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने सिन्नर फाटा भागात सापळा रचला. व आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
![]()

