नाशिक (प्रतिनिधी): स्टॉप अँड सर्च कारवाईत कारमध्ये गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. गंगापूर पोलिसांनी नेर्लेकर चौक, नरसिंहनगररोड येथे ही कारवाई केली. संशयित कारचालक चेतन दत्तात्रय कवरे (३६, रा. शांतीनगर) यास अटक करण्यात आली.
संशयिताच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस ठाण्याचे बीट मार्शल प्रवीण केदारे आणि अशोक निगळ परिसरात रात्री १० वाजता गस्त करत असतांना नर्लेकर चौक येथे एमएच १५ जेएम ४४४८ या क्रमांकाची ब्रीझा कार दिसून आली.
कारजवळ जाऊन कारचालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. पथकाला संशय आल्याने कारची झडती घेतली असता चालक सीटच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यात देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि त्यात २ जिवंत राऊंड मिळून आले. चौकशीत त्याने चेतन कवरे असे नाव सांगीतले. परवान्याबाबत विचारणा केली असता संशयिताकडे परवाना नसल्याचे समजले. कारसह गावठी कट्टा जप्त केला. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरीष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
![]()


