
नाशिक (प्रतिनिधी): मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा पीए असून मोठमोठ्या लोकांशी ओळख असल्याची बतावणी करत तीन ते चार बेरोजगार युवकांना लाखो रुपयांना गंडा घालणारा तोतया प्रकाश धोंडु कदम (रा. बदलापूर) याला गुंडाविरोधी पथकाने लासलगावजवळील विंचुर फाटा (ता. निफाड) येथे गुरूवारी (दि. २७) दुपारी बेड्या ठोकल्या.
नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल ७१ लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारीला फिर्याद दिली होती. २०२३ मध्ये संशयित आरोपी प्रकाश कदम याने फसवणूक केली. कदम गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ओळख लपवून फिरत होता. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून कदमचा ठावठिकाणा काढला.
विंचुरफाटा येथे गुरुवारी (दि.२७) सापळा रचण्यात आला. गुंडाविरोधी पथकाचे पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांनी ही कारवाई केली. आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून माहिती घेण्यात आली. प्रकाश कदम हा लासलगाव परिसरात येत जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला. त्याला पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने पार पाडली.