
नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: शहराच्या उपनगरात अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली नामांकित कंपनीचा सुगंधित पान मसाला (गुटखा) अवैधरित्या तयार करणाऱ्या कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत सुमारे ७ लाख २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राजस्थानातील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. २६ डिसेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, वालदेवी नदीलगत दाढेगाव शिवारातील पिंपळगाव खांब रोड परिसरात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली कोणताही परवाना नसताना सुगंधित पान मसाला तयार केला जात आहे.माहितीची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये दोन मशीनच्या साहाय्याने ‘प्रीमियम राज निवास’ या नावाने सुगंधित पान मसाल्याची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले.
या कारखान्यातून रामअवतार सीपू देवी दांदल (वय २४, रा. गाव भावला, नागौर, कचरास, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह तयार सुगंधित पान मसाला, पान मसाला बनविण्याचे कच्चे साहित्य व इतर साहित्य असा एकूण ७,२९,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत. अवैध गुटखा निर्मितीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच मालाची विक्री कुठे केली जात होती, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
![]()

