नाशिक, दि. २७ मे २०२५: गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून प्रकरणाचा तपास करत गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. २६ मे २०२५ रोजी रात्री ११.११ च्या सुमारास गोकुळ अॅपार्टमेंटजवळ, शिवाजीनगर येथील रस्त्यावर इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन आणि गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असता सदर इसम गंभीर अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याच्या शरीरावर हल्ल्याचे स्पष्ट खुणा होत्या. त्याच्या खिशातील आधारकार्डवरून त्याचे नाव नसीम शहा (रा. भुईगाव, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. गंगापूर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने तिघांचा सिन्नर फाटा आणि चांदोरी (सायखेडा) परिसरातून पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये विशाल दिनेश तिवारी (रा. रो हाऊस नं. १, आंबेडकर हॉलच्या पाठीमागे, सातपूर), अदित्य दत्ता वाघमारे (रा. आंबेडकर हॉलच्या पाठीमागे, सातपूर) आणि वैभव विनायक भुसारे (रा. अशोकनगर, सातपूर) यांचा समावेश आहे.
तिघा आरोपींनी नसीम शहावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केली होती. गुन्हा करून ते मोटारसायकलवरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांच्या वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली.