नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२५: निकम गँगचा किरण निकम याच्या खून प्रकरणात तब्बल 8 वर्षापासून फरार विकास उर्फ विक्की विजय पंजाबी यास अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये ही कारवाई केली. १८ मे २०१७ रोजी नवनाथनगर येथे उघडे गँगने किरण निकमचा खून केला होता. घटनेच्या दिवसापासून संशयित फरार होता.
पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड यांना माहिती मिळाली. खुनाच्या गुन्ह्यातील फरार मुख्य संशयित विक्की पंजाबी उर्फ ‘खलनायक’ हा चंदिगढमध्ये हॉटेल व्यवसाय करत असल्याचे समजले. पथक चंदिगढ येथे रवाना झाले. त्याची खलनायक म्हणून ओळख आहे. सध्या तो हिमाचलमध्ये पुलगा गावात हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. पहाडी वस्तीत सलग दोन दिवस घरे व हॉटेलची तपासणी केली असता तो हॉटेलमध्ये दिसून आला. त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
कुलू न्यायालयातून ट्रान्झिस्ट रिमांड घेण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यात गणेश उघडे, संतोष उघडे, संतोष पगारे, बंडू मुर्तडक यांना ९ मे २०२३ रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
सदरची कामगिरी गुंडा विरोधी पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिथके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790