
नाशिक। दि. २४ सप्टेंबर २०२५: गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने स्टेट बँक चौक, लेखानगर येथे पथकाने ही कारवाई केली. भरत बाळासाहेब जगताप (३३, रा. खाणगावथडी, ता. निफाड) असे या संशयिताचे नाव आहे.
रेकॉर्डवरचा गुन्हेगार भरत जगताप पिस्तूल बाळगत दहशत निर्माण करत आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाचे विशाल काठे, विशाल देवरे यांना मिळाली. पथकाचे प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, मुख्तार पठाण, मिलिंदसिंग परदेशी आदींनी परिसरात सापळा रचून संशयिताला पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्तूल मिळाले.
संशयिताच्या विरोधात सायखेडा पोलिस ठाण्यात ४, निफाड २, लासलगाव १, पंचवटी २ आणि अंबड १ असे १० गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. घातपाताच्या उद्देशाने तो पिस्तूल बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
![]()

