
नाशिक। दि. २४ जुलै २०२५: रिपाइं शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना गंगापूर पोलिसांसह खंडणीविरोधी पथकाने माग काढत बेड्या घातल्या.
गंगापूर पोलिस ठाण्यात अर्जुन पगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाने गोवर्धन गावात मध्यरात्री सापळा रचत तडीपार असलेला मुख्य संशयित राहुल मच्छिंद्र पवार (३२, रा. मरिमाता मंदिरासमोर, गंगापूर गाव), योगेश उर्फ अॅण्डी चंद्रकांत धांडे (३२, रा. साईराम सीताईनगर, ओझर) याला राहत्या घरातून, तर एकनाथ उर्फ एक्का किसन तिटकारे (३२, रा. वाकी डहाळेवाडी ता. इगतपुरी) याला घोटी येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार: गिरीष महाले, रविंद्र मोहिते, गणेश रहेरे, पोलीस अंमलदार: सोनु खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, तुलसी चौधरी, मच्छिंद्र वाकचौरे, मुकेश गांगुर्डे, विजय नवले सर्व नेमणुक गंगापुर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक सगळे, भोई, पोलीस हवालदार चकोर, योगेश चव्हाण, पोलीस नाईक जगझाप, भूषण सोनवणे, दिघे व पोलीस अंमलदार भगवान जाधव, राउत, निकम अशांनी केली आहे.