
नाशिक। दि. २४ जून २०२५: कत्तलीकरता गोवंशची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. ट्रकमधून ९ गायी व ६ वासरांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने चेहडी गाव, दारणेश्वर मंदिरासमोर, पुणे रोड येथे ही कारवाई केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात २ संशयितांच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे मनोहर शिंदे यांना ट्रकमधून गोवंशची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचत जीजे २४ व्ही ८५६३ या क्रमांकाचा ट्रक थांबवला.
ट्रकमध्ये गायी व वासरे कोंबून भरलेले दिसून आले. चालक बिलाल उस्मान मरेडिया (रा. पाटण), महेंद्रसिंग जगतसिंग जाधव (रा. बनासकाठ, गुजराथ) या दोघांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, शंकर काळे अदीच्या पथकाने ही कारवाई केली. गोवंश पांजरपोळ येथे संगोपनाकरीता पाठवण्यात आले.