
नाशिक। दि. २३ ऑगस्ट २०२५: दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना पळसे एमआयडीसी रोड येथे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. त्यांच्याकडून २८ धारदार चाकू, कोयता, नायलॉन दोरी, मिरचीची पूड जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.२१) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गुरुवारी म्हणजेच दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पळसे गावचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी ११२ ला फोन करून गावात काही संशयित चोर आले असल्याची माहिती दिली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण कोरडे, उपनिरीक्षक संदीप पवार हे मिळालेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या दरोडेखोराचा शोध घेत होते.
उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विशाल पाटील, अविनाश देवरे, विशाल कुवर, अरुण गाडेकर, महेंद्र जाधव, सागर आडणे, योगेश रानडे यांनी मिळालेल्या माहितीनुसार पळसे गाव शिवारातील टेंभी मळा येथे सापळा रचून संशयित रवी कुमार भोई ( वय:२७, राहणार: अंबरनाथ, कल्याण), शिवा विक्रम वैदू (वय: ३६, राहणार: आनंद नगर, जळगाव), विष्णू शंकर भोई (वय: ३०, राहणार: टायगर गाव कल्याण फाटा, ता. कल्याण), आकाश गोपाळ वैदू (वय: ३८, राहणार: पाचोरा) यांना दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना शिताफीने पकडले. त्यांच्या पाचवा साथीदार श्याम विष्णू भोई (रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड नाशिकरोड) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चौघा संशयितांना शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.