
नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलिसांकडून परिसरात नाकाबंदी करत ‘स्टॉप-सर्च’ कारवाई केली जात होती. पुणे महामार्गावर या कारवाईतून बचाव करण्यासाठी दुचाकीचालकाने पळ काढला असता पथकाने पाठलाग करून त्यास पकडले.
संशयित अनिकेत ऊर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. राजनगर, गोवर्धन) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे लक्षात येताच पथकाने कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गुन्हे शोध पथकांना चोरीस गेलेल्या दुचाकी शोधण्याबाबत आदेशित केले होते. जेलरोड शिवाजीनगर येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना गुन्हे शोध पथकातील विनोद लखन यांनी विना नंबरप्लेट असलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या संशयित युवकास हटकले; मात्र त्याने तेथून पळ काढला असता पथकाने त्याचा पाठलाग करत पकडले.
अंगझडतीत चार मोबाइल सापडले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने उपनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यास अटक केली.
संशयित दुचाकी चोराविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. शार्दुल हा तेथे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी पथकाला परिसरात रवाना केले. दुगाव, गंगापूर धरणांच्या काठालगत दुचाकी जप्त करण्यात आल्या.
![]()


