
नाशिक, दि. २२ मे २०२५: अपहरण व खंडणीसह जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल असलेला आणि गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला आकाश विश्वनाथ वानखेडे (वय ३१, रा. दोंदेमळा, पाथर्डी) याला पोलिसांनी शासकीय जिल्हा रुग्णालयात सापळा रचून अटक केली.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिस अंमलदार अमोल कोथमिरे यांना वानखेडे जिल्हा रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी त्वरित प्रभारी पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
पोलिस अंमलदार पवन परदेशी, सागर कोळी, सौरभ माळी आदींच्या पथकाने बुधवारी (दि. २१ मे) रुग्णालय परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी आकाश वानखेडे उपचार घेत असलेल्या मित्राला भेटण्यासाठी रुग्णालयात आला असता, पोलिसांनी त्याची ओळख पटवून तात्काळ त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.