
नाशिक। दि. २१ जून २०२५: म्हसरुळ, दिंडोरीरोड, मखमलाबाद परिसरात वाहने तोडफोड करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या धात्रक टोळीचा म्होरक्या सुनील उर्फ सोन्या बाबुराव धात्रक (रा. मखमलाबाद) याला जेरबंद करण्यास खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. पथकाने पुणेरोडवरील नायगाव रोडवर शिंदे गाव येथे ही कारवाई केली. संशयिताच्या विरोधात खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे असे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सादर संशयित आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना, धात्रक टोळीचा प्रमुख सोन्या धात्रक हा रात्री शहरात येत असल्याची माहिती मिळाली. मात्र तो कुठे आणि कसा येतो याची माहिती नव्हती. नाशिक शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने धुळे, संभाजीनगर आणि पुणे महामार्गावर सलग आठ दिवस सापळा रचला. अखेर पुणे महामार्गावर शिंदे गाव, नायगावरोड येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने परिसरात सलग पाच तास सापळा रचून संशयिताला अटक केली.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक: रविंद्र दिघे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप व सविता कदम यांच्या पथकाने केली.
![]()

