
नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२५: खंडणीविरोधी पथकाच्या कारवाईत हद्दपार सराईत गुन्हेगार राहुल सुनिल खंडारे (वय २३, रा. धात्रक फाटा, नाशिक) यास धारदार हत्यारासह अटक करण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व भरत राऊत यांना संशयित आरोपी राहुल खंडारे हा धारदार हत्यार हातात उघडपणे घेवुन सार्वजनिक ठिकाणी दशहत माजवुन बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून दुकानदारांकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप आहे.
या अनुषंगाने १९ ऑगस्ट रोजी महालक्ष्मीनगर, धात्रक फाटा येथील गौरव हाइट्स इमारतीलगतच्या मोकळ्या जागेत सापळा रचून खंडारे याला पकडण्यात आले. त्याच्याकडून धारदार हत्यार जप्त करण्यात आले असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खंडारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला पूर्वी हद्दपार करण्यात आले होते. तरीदेखील तो नाशिक शहरात वावरत असल्याचे आढळले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत व सविता कदम यांच्या पथकाने केली.