

नाशिक, 19 मे 2025: पाथर्डी फाटा परिसरात स्वराजनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या दोघांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. आनंदनगर परिसरात दहशत माजवून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन युवकांसह पाच विधी संघर्षग्रस्त बालकांना मुददेमालासह ताब्यात घेतले आहे.
१६ मे रोजी स्वराजनगर, पाथर्डी शिवार येथे काही अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहनांची काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाची जबाबदारी सोपवली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सिंहस्थनगर परिसरातील एका घरात लपून बसलेल्या संशयित धनंजय नामदेव कोल्हे (वय १८, रा. अंजनगाव) आणि दीपक राजेंद्र पवार (वय १८, रा. बजरंगवाडी, विल्होळी) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी पाच अन्य अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ६ वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान अंबड पोलीस ठाण्यात दाखल अन्य एका गुन्ह्यातही या पाचपैकी तीन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि सौरभ माळी यांच्या पथकाने केली.