🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

नाशिक। दि. १९ फेब्रुवारी २०२६: शहरातील विविध भागांत पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत इराणी टोळीतील मुख्य आरोपीस नाशिकरोड गुन्हे शाखेने अंबिवली (जि. ठाणे) येथून अटक केली आहे. आरोपीकडून एकूण १० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून सुमारे १८ लाख रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी संजू इराणी हा पहाटे अंबिवली रेल्वे स्थानक परिसरात येत असल्याची खात्री पटली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटक आरोपीचे नाव जाफर मलिक सय्यद उर्फ संजू इराणी (वय ५३, रा. मंगल नगर, आटाळी गाव, ता. कल्याण, जि. ठाणे) असे आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध वाहतूक मार्गात बदल

आरोपी व त्याच्या साथीदारांनी इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड परिसरात ज्येष्ठ महिला व पुरुषांना गाठून “पुढे चोरी झाली आहे”, “पोलीस तपास सुरू आहे”, “दागिने काढून सुरक्षित ठेवा” अशा सबबी सांगत हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास केल्याचे तपासात उघड झाले आहे. २० नोव्हेंबर २०२५ रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिराजवळ ७४ वर्षीय महिलेची सुमारे १५ ग्रॅम सोन्याची चैन अशाच प्रकारे लुटण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास नाशिकरोड गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करा- आयुक्त शेखर सिंह

तपासादरम्यान आरोपीने काही चोरीचे दागिने माणेक चौक, अहमदाबाद (गुजरात) येथे विक्री केल्याचे कबूल केले. पोलिस पथकाने तेथे जाऊन दागिने हस्तगत केले. तसेच अंबिवली येथे लपवून ठेवलेले काही दागिनेही जप्त करण्यात आले.

उपनगर, नाशिकरोड व इंदिरानगर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण १० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हे नोंद आहेत. एकूण १८ लाख रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; मुद्देमाल जप्त !

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने केली. तांत्रिक विश्लेषण शाखेचीही महत्त्वपूर्ण मदत मिळाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790